पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत ‘गार्बेज फ्री सिटी’ (कचरामुक्त) स्पर्धेतील पंचतारांकितसाठी सर्व नियम पिंपरी चिंचवड महापालिका पूर्ण करीत आहे. त्यामुळे शहराला ‘गार्बेज फ्री सिटी’ स्पर्धेत पंचतारांकित दर्जा मिळावा यासाठी महापालिका केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहे. त्यासाठी महासभेची मान्यता घेण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी देशातील मोठ्या शहरामध्ये स्पर्धा घेतली जाते. गेल्या वर्षापासून त्यामध्ये कचरामुक्त शहरांसाठी मानांकनाचा समावेश केला होता. ‘फाइव्ह स्टार’, ‘थ्री स्टार’ आणि ‘वन स्टार’ अशा तीन स्वरुपात त्याची वर्गवारी करण्यात आली होती. देशभरातील शहरे त्यामध्ये सहभागी होतात. या रेटिंगसाठी कचरा प्रक्रिया, संकलन, वर्गीकरण १०० टक्के बंधनकारक करण्याचे निकष असतात. नदी, नाले व शहरातील तलाव यांची स्वच्छता व उपाययोजनांचा समावेश असतो.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरास पंचतारांकित नामांकन (फाइव्ह स्टार) मिळण्यासाठी पालिका काम करत आहे. केंद्र सकारने केलेल्या नियमावली, मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धतीनुसार उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील घऱोघरी कचरा संकलन करणे, घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण करणे. कचऱ्याची वाहतूक, प्रक्रिया करण्याकरिता केलेली व्यवस्था गटार, नाले व सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छता ऍपचा वापर, प्लॅस्टिक बंदी, ५ टीपीडी ‘प्लॅस्टिक टू फ्युअल’ची व्यवस्था केली आहे का याबाबत परीक्षण होते.
पिंपरी चिंचवड शहर पंचतारांकितसाठीचे सर्व नियम पूर्ण करत आहे. त्यामुळे शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत कचारमुक्त शहर म्हणून पंच तारांकित नामांकन दर्जा मिळविण्यासाठी अर्ज केला जाणार आहे. त्याबाबत ८ डिसेंबर रोजीच्या महासभेमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group