आळंदी (Pclive7.com):- आळंदी नगरपालिका नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे पती अशोक कांबळे यांचा पालिकेच्या कामकाजात वारंवार होणारा हस्तक्षेप व ढवळाढवळ रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना त्वरित कार्यवाही करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला.
याबाबत खेड प्रांताधिकारी कार्यालयाने तक्रारदारांच्या तक्रारीतील तथ्य तपासून चौकशी अहवाल २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी देशमुख यांनी आजची कार्यवाही केली. आळंदी पालिकेत नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर या भाजपाकडून लोकमतातून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. नगराध्यक्षपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित होते. मात्र नगराध्यक्षपदाचा पदाभार सांभाळल्यानंतर त्यांचे पती अशोक कांबळे हे वारंवार पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत होते. नागरिकांना अडवून कशासाठी आलात विचारणा करत होते. आवकजावक विभागात पत्रव्यवहार तपासणी करत होते. तसेच सभेचे कामकाज, चर्चा आणि प्रशासकिय बैठकांनाही उपस्थिती दाखवित होते. कर्मचारी, अधिकारी यांच्याशी वाद करत होते.
एकंदर नगराध्यक्षांपेक्षा त्याचे पतीच कोणताही अधिकार नसताना प्रशासकिय कामकाजात ढवळाढवळ करत होते. अखेर नागरिकांनी कंटाळून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी स्तरावर तक्रारी केल्या होत्या. नागरिकांचीही वाढत्या हस्तक्षेपामुळे कुचंबणा होत होती. आता जिल्हाधिका-यांनी हस्तक्षेप थांबविण्यासाठी आदेश दिल्याने पालिका नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी पुढील कार्यवाही काय करतात याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले आहे.
याबाबत मुख्याधिकारी अंकुश जाधव म्हणाले की, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावर कार्यवाही करून आज अशोक कांबळे यांना पत्र देवून हस्तक्षेप न करण्याबाबत सुचित केले जाईल.






















Join Our Whatsapp Group