Homeपिंपरी-चिंचवडप्राधिकरणाचा अविकसित भाग पीएमआरडीएऐवजी पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्ग करा; महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्राधिकरणाचा अविकसित भाग पीएमआरडीएऐवजी पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्ग करा; महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण करताना प्राधिकरणातील विकसित भागांसोबतच अविकसित भागही पिंपरी चिंचवड महापालिकेकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात महापौर ढोरे, पक्षनेते ढाके म्हणाले, शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ (एमआयडीसी) या तीन नियोजन संस्था कार्यरत आहेत. या नियोजन संस्थांमार्फत शहरामध्ये रस्ते विकसन, निवासी, बिगरनिवासी व औद्योगिक इमारतींना बांधकाम परवानगी देणे, पाणीपुरवठा करणे व शहराचा मुलभूत विकासाची कामे केली जातात.
या तीन वेगवेगळ्या संस्थांचे शहराच्या विकासकामांवर वेगवेगळे नियंत्रण असल्याने विकासकामांबाबत कोणताही निर्णय घेत असताना वेळोवेळी अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात. अशा स्थितीत आता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) अविकसित असलेला भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) विकसनासाठी दिल्यास शहराच्या विकासकामांमध्ये आणखी चौथी संस्था निर्माण होईल. त्यामुळे अडचणींमध्ये आणखी भर पडू शकते.
शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या व औद्योगिकीरण याचा विचार करून शहराचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी व विकासकामांत उद्भवणाऱ्या अडचणी वेळीच दूर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) विकसित भागाबरोबर अविकसित असलेला भागही महापालिकेमध्ये वर्ग होणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून प्राधिकरणाचा अविकसित भाग सुद्धा महापालिकेत वर्ग करण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.