पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबितांसाठी कार्यान्वित असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजनेला ८ फेब्रुवारी पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत योजना बंद करू नये असा आदेश औद्योगिक न्यायालयाने महापालिकेला दिला आहे.
महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना १ सप्टेंबर २०१५ पासून लागू करण्यात आली होती. ही योजना कर्मचारी हिताची होती. परंतु, कर्मचारी, महासंघाचा विरोध डावलून प्रशासनाने महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबितांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजनेऐवजी ४ जानेवारी पासून वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे.
धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्यात येऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाने आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. कर्मचाऱ्यांचा विरोध असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ४ जानेवारी २०२१ रोजी विमा पॉलीसी लागू केली. आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आक्षेप घेत या निर्णयाविरोधात कर्मचारी महासंघाने औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली.
महासंघाच्या वतीने मागणी केल्यानुसार आणि सादर केलेल्या कागदपत्रानुसार न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत धन्वंतरी योजना बंद करण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश दिला आहे. पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. याबाबतची महिती महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group