पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक व स्वीकृत प्रभाग सदस्यांचे राजीनामा घेऊन नवीन सदस्यांची निवड करावी. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले (आरपीआय)च्या पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांची निवड करावी. अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढू असा इशारा रिपाईच्या वतीने भाजपाला देण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने यासंदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी रिपाईचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, रिपाई महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब भागवत, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, पिंपरी चिंचवड रिपाई युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर, रिपब्लिकन एम्प्लॉईस फेडरेशनचे अध्यक्ष पुणे जिल्हा विनोद चांदमारे, रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष शेखलाल नदाफ, रिपब्लिकन विद्यार्थी परिषदचे शहराध्यक्ष सुजित कांबळे आदींच्या उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक व स्वीकृत प्रभाग सदस्य बदलण्याच्या हालचाली चालू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत २४ स्वीकृत प्रभाग सदस्य व ३ भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीस पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी एक हाती सत्ता दिली. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चा सिंहाचा वाटा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रिपाई कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवारास भरभरून मते दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने रिपाई पक्षास केवळ ३ जागा दिल्या होत्या. सत्ता आल्यास पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत वाटा देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु भाजपाने ते आश्वासन पाळले नाही. केवळ एक स्वीकृत प्रभाग सदस्य पद देऊन मित्रपक्षाची बोळवण केली. आता स्वीकृत प्रभाग सदस्य व स्वीकृत नगरसेवक बदलाच्या हालचाली चालू आहेत. मागील चार वर्षापासून भाजपाने कधीही मित्रपक्षास विचारात घेतले नाही. अथवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात बोलावले नाही. तसेच शहराच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारणीला नेहमी सावत्र पणाची वागणूक दिली गेली.
आगामी महापालिका निवडणूक १ वर्षवर येऊन ठेपली आहे. तरी भाजपा मित्र पक्षास विश्वासात घेत नाही असे वारंवार वाटत आहे. तरी स्वीकृत नगरसेवक व स्वीकृत प्रभाग सदस्य यांचे राजीनामा घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यकर्त्यांस संधी द्यावी. जेणेकरून पिंपरी चिंचवड शहरात एक चांगला सामाजिक संदेश जाईल.
अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहरात आपली वेगळी चूल २०२२ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मांडेल. तसेच स्वतंत्रपणे २०२२ पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका लढवेल आणि यास पूर्णपणे पिंपरी चिंचवड शहर भाजपा कारणीभूत असेल असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group