पिंपरी (Pclive7.com):- पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला महापालिकेने मालमत्ता कर थकविल्याची नोटीस दिली आहे. संथेने १ कोटी ८३ लाख मालमत्ता कर थकविला आहे. तसेच २५ लाखांच्या पुढील थकबाकी असलेल्या ३२५ मालमत्ताधारकांनाही महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत. सात दिवसांच्या आत थकबाकी भरावी. अन्यथा मालमत्ता सील करण्याचा इशारा दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आजअखेर ५ लाख २७ हजार ३३८ मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी ४ लाख ४७ हजार ८, बिगरनिवासी ४६ हजार ८२८, औद्योगिक ३ हजार ७००, मोकळ्या जागा ८ हजार ७८१, मिश्र १५ हजार ८१९ आणि इतर ५ हजार २०२ मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते. परंतु, अनेक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. कर थकविला आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे.
महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. १६ विभागीय कर संकलन कार्यालयामार्फत थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. २५ हजारांपासून पुढे थकबाकी असलेल्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. प्राधान्याने २५ लाखांच्या पुढील थकबाकीदारांना नोटीसा दिल्या आहेत. २५ लाखांपुढील ३२५ थकबाकीदार आहेत. या सर्वांना नोटीसा दिल्या आहेत. सात दिवसांत थकबाकी भरण्यात यावी. अन्यथा मालमत्ता सील करण्यात येईल, असे नोटीसीत म्हटले आहे.
यामध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला देखील नोटीस दिली आहे. त्यांच्याकडे १ कोटी ८३ लाखांची थकबाकी आहे. नियमानुसार त्यांना नोटीस दिली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group