पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेतील घोटाळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून बँकेच्या रिकव्हरी विभागातून स्वत:चे खासगी सामान घेऊन जाण्याच्या नावाखाली बँकेचा डाटा कॉपी करुन घेतला. तसेच बँकेची कागदपत्रे फाडून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी माजी चेअरमन अमर मुलचंदानी (वय ६३, रा. पिंपरी), माजी अतिरिक्त कार्यकारी संचालक निखिल शर्मा (वय ३५, रा. पिंपळे सौदागर), हितेश ढगे (वय ३२, रा. काळेवाडी) व एक अनोळखी व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सेवा विकास बँकेचे रिकव्हरी ऑफिसर रश्मी मंगतानी यांनी चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना चिंचवडमधील सेवा विकास बँकेच्या शाखेत सोमवारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सेवा विकस बँकेचे माजी चेअरमन अमर मुलचंदानी यांच्या सांगण्यावरुन तसेच बँकेचे माजी अतिरिक्त कार्यकारी संचालक निखिल शर्मा यांच्या सूचनेवरुन संगनमत करुन हितेश ढगे हा त्याच्याबरोबर एकाला घेऊन बँकेत आला. त्याने शाखा व्यवस्थापकाची परवानगी न घेता बँकेच्या रिकव्हरी विभागातून स्वत:चे खासगी सामान घेऊन जाण्याच्या उद्देशाने आलो असल्याचे सांगितले.
रिकव्हरी विभागातील कॉम्प्युटरमधून बँकेचा डाटा स्वत:चे पेनडाईव्हमध्ये विनापरवानगी कॉपी करुन घेतला. रिकव्हरी विभागातील फाईलमध्ये बँकेची कागदपत्रे घेऊन जात असताना त्यास बँकेच्या कर्मचार्यांनी हटकले. तेव्हा त्याने त्याच्याजवळील पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची एफआयआर कॉपी व सेवा विकास बँक असे नाव असलेला नकाशा अशी कागदपत्रे फाडून पुरावा नष्ट केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासास असलेल्या गॅलेक्सी कन्स्ट्रक्शनची फाईल त्याने चोरुन नेला असे फिर्यादीत म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group