पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत कोरोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने किती रक्कम कशा प्रकारे खर्च केली, याबाबतची सविस्तर माहिती देण्यात यावी. त्याचप्रमाणे ‘सीएसआर’मधून खाजगी कंपन्यांनी पालिकेस किती मदत कशाप्रकारे केली, याचीही सविस्तर माहिती देण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.
याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची भेट घेवून सविस्तर माहिती मागविली आहे. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, पुणे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष करण कोकणे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सन २०१७ पासून स्थापत्य, पाणी पुरवठा जलनिस्सारण इत्यादी विभागामार्फत विविध विकास कामांसदर्भात निविदा काढल्या जातात. त्यामध्ये बहुतांश वेळा ठेकेदार व अधिकारी मिळून रिंग करुन ठराविक ठेकेदारांनाच निविदा मिळतील, अशा प्रकारे निविदा अटी शर्ती ठेवतात. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे मार्च २०२० पासून शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाला. त्याला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाय योजना युध्दस्तरावर चालू केल्या.
यामध्ये मास्क, सँनिटाझर इत्यादीच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. त्याचप्रमाणे पालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आली होती. त्यांची बिलेही एकही रुग्ण नसताना देण्याचे घाट घातला जात आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सीएसआर अंतर्गंत विविध खासगी कंपन्यांनीही महापालिकेस मदत केली. परंतु, त्यांनी किती मदत केली, कशा स्वरुपात केली याचा हिशोब अद्याप लागत नाही.
कोविड काळात रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने महापालिकेकडे बिले सादर केली आहेत. हे सर्व संशयास्पद असून त्यांना बिल अदा करु नये. अशा प्रमाणे इतर रुग्णालयांनी तसेच खासगी कोविड सेंटरने बिले सादर केली असतील तर ती देऊ नयेत.
तसेच यापूर्वी किती आणि कोणत्या खासगी कोविड सेंटरला बिले अदा केली आहेत, त्याचा तपशील द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group