पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील सत्ता सर्वत्र परिवर्तनची नांदी दिसत आहे. त्याचाच प्रत्यय म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामध्ये नाराज नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महापालिका निवडणुक अवघ्या वर्षावर येऊन ठेपली असताना सत्ताधारी भाजपाला सुरूंग लागला आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ‘शब्द’ दिला असतानाही महत्त्वाच्या पदांवर संधी दिली नाही, असा आक्षेप घेत नगरसेविका माया बारणे यांनी शिक्षण समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे बारणे यांनी राजीनामा सोपवला असून, पक्षाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाराज नगरसेविका माया बारणे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे बारणे यांच्या रुपाने पिंपरी चिंचवड भाजपाला पहिला धक्का बसणार आहे.
२०१७ मध्ये महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर ‘एक पद- एक नगरसेवक’ असे सूत्र अवलंबून प्रत्येक नगरसेवकाला पदवाटपात समान संधी दिली जाईल, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी घेतली होती. मात्र, पक्षातील २५ ते ३० टक्के नगरसेवकांना पदवाटपात डावलण्यात आले आहे. परिणामी, अनेकजण नाराज असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पर्यायायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत.
संतोष बारणे यांनी दिले होते संकेत…
२०२२ मध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. तत्त्पूर्वी भाजपामधील नाराज नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी मध्यंतरी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शास्ती थकबाकी वगळून मूळ मिळकतकर भरण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे फ्लेक्स संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये लावले होते.






















Join Our Whatsapp Group