पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात साडेतीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या काळात शहराच्या बाह्य सौदर्यात भर घालता आली नाही. मात्र रस्ते, पाणी, कचरा, जलनि:सारण बाबतीत काम करून भविष्यातील शहराची पायाभरणी करून दिली, असा दावा पिंपरी चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
गेल्या वर्षाभरापासून सतत बदलीची चर्चा होत असलेल्या महापालिका आयुक्त हर्डीकर यांची अखेर शुक्रवारी (दि.१२) बदली झाली. बदलीच्या आदेशानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हर्डीकर म्हणाले की, शहरातील सर्व घटकांच्या सहकार्याने शहरात काम केले. शहर परिवर्तनासाठी रोडमॅप तयार करून त्याप्रमाणे काम केले. शहात किचकट बनलेला कचऱ्याचा प्रश्न निकाली लावला. पाणीपुरवठ्यात अधिक काम करत शहरातील आगामी वर्षातील पाणी समस्या सोडविण्यावर भर दिला. त्यासाठी २४ तास पाणी योजना, आंद्रा, भामा आसखेडचे पाणी आणणे आणि पवना जलवाहिनीसाठी प्रयत्न केले.
अमृत योजनेतून शहरात २०० किमी ड्रेनेजचे जाळे तयार झाले. वाहतूक नियोजनासाठी महत्त्वाच्या रस्त्याचे नियोजन केले. निगडीपर्यंत मेट्रोचा विषय शासनाकडे केला. रखडलेले बीआरटी मार्ग सुरू झाले. वैद्यकीय सुविधांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले, ही आनंदाची बाब आहे. तसेच, भोसरी, जिजामाता, तालेरा रुग्णालये उभारली. परंतु, शैक्षणिक यात फारसे काम करता आले नाही.
आर्थिकदृष्ट्या शहर वृध्दींगत करण्यावर भर दिला. त्यात आवास योजनेबरोबर खासगी क्षेत्रातही स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलल्याचे हर्डीकर यावेळी म्हणाले.
हर्डीकर म्हणाले, हे शहर जसे श्रीमंतांचे आहे, तसे ते गरिबांचेही असल्याचा उल्लेख केला. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन आणि फेरीवाल्यांसाठी खास काम करता आले नसल्याचे त्यांनी म्हटले.






















Join Our Whatsapp Group