पिंपरी (Pclive7.com):- महाविकास आघाडीच्या अभिनंदनाच्या ठरावावरून सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपाचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या टिकेनंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले होते. त्यानंतर सभागृहात काहीकाळ गोंधळ झाला. महापौर माई ढोरे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. परंतू सभागृहात महाविकास आघाडीच्या अभिनंदनाचा ठराव झालाच नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (दि०९) होती. महापौर माई ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला भाजपाचे एकनाथ पवार यांनी विरोध केल्याने चांगलाच गोंधळ झाला.
सभेच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी महाविकास आघाडीच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता दिल्याबद्दल आणि अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजना, नवीन घर घेताना घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी अनुमोदन दिले. या अभिनंदन ठरावाला माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोध केला.






















Join Our Whatsapp Group