महापालिका निविदा प्रक्रियेत नातेवाईकांनी सहभाग घेतल्याचा केला आरोप
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 20 च्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या कुटूंब सदस्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे. हे नियमाचा भंग करणारे असल्याचा आरोप माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी ननावरे यांनी केली.
ननावरे म्हणाले की, महानगरपालिका अधिनियम 11 मधील पोटकलम ‘ड’ किंवा अप्रत्यक्षरित्या कलम 10, पोटकलम (2) खंड (ब) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे महापालिकेचा सदस्य किंवा महापालिकेच्या कोणत्याही समितीचा सदस्य या नात्याने काम करील तर, त्याचे पालिका सदस्य म्हणून पद धारण करणे बंद होईल. तसा नियम आहे.
मात्र या तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत धर यांचे पद रद्द होणे प्रचलित कायद्यानुसार बंधनकारक आहे. सुलक्षणा शिलवंत धर यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महापालिका सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. अशी माहिती ननावरे यांनी बुधवारी (दि. 10 मार्च) पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली.
धर यांच्यावर कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच न्यायालयातही जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
माझा ‘त्या’ कंपनीशी काही संबध नाही – सुलक्षणा शिलवंत-धर
माझा आणि अँडसिन कंपनीचा काही संबध नाही. माझ्यावर केलेले आरोप खोटे असुन मला मान्य नाही. ज्यांनी कुणी जिथे कुठे तक्रार केली तिथुन मला विचारणा झाल्यास मी तिथे उत्तर देईन. हा एक राजकीय स्टंट दिसत आहे. या मागे बोलवता धनी दुसराच कोणी आहे. योग्य वेळेत योग्य उत्तर देऊ.