पिंपरी (Pclive7.com):- बनावट दस्त नोंदणी व ब्लॅकमेल करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दि सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या सह तब्बल २८ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१२) पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता किशोर चव्हाण (वय ६०, रा. एन आय बी एम रोड, महमंदवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार १)दि सेवा विकास को. ऑप. बँकेचे चेअरमन अमर साधुराम मुलचंदानी, २) मनोहर मुलचंदानी, ३) अॅड. अशोक मुलचंदानी, ४) सौ. दया अशोक मुलचंदानी, ५) दिपा जितु मंगतानी, ६) राजेश पी. सावंत, ७) चंद्रशेखर अहिरराव, ८) नरेंद्र पी. ब्रम्हणकर, ९) प्रकाश नंदभारती, १०) धीरज एस. भोजवानी व इतर सर्व पदाधिकारी व अधिकारी, ११) मुख्य सी.ई.ओ. बँच मॅनेजर, १२) कर्ज अधिकारी विनय आरान्हा, १३) दत्तात्रय डोके, १४) अश्विन कामत, १५) मयुर श्राफ, १६) किशोर केसवानी, १७) भल्ला ऊर्फ महादेव साबळे, १८) गणेश वर्मा, १९) निखील शर्मा, २०) कालिदास सुतार, २१) हितेश ढगे, २२) कोमल लुल्ला, २३) डॉली सेवानी, २४) राजु तनवानी, २५) चंदनसिंग, २६) अॅडलॅब एंटरटेनमेंट लि. चे सर्व भागीदार व संचालक, २७) भुमिक एंटरप्रायजेसचे सर्व भागीदार व संचालक २८) सदर कर्ज प्रकरणामधील जामीनदार नामे प्रशांत अरूण पाटील व जुन रेयान फर्नाडिझ व इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी अनिता यांची बनावट कागदपत्रे तयार करून सह. दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला सादर केली व दस्त नोंदणी केला. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीला बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. बॅंकेच्या पदाधिकारी यांनी संगनमताने १ कोटी २५ लाख रुपये मंजूर करून आपापसांत खात्यावर वर्ग केले. २५ लाख रुपयांची रक्कम काढून चेअरमन व इतरांनी वाटून घेतली, असं फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, दि सेवा विकास को-ऑप बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी पोलिसांनी रविवारी (दि. ०७) रात्री उद्योगपती व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने मूलचंदानी यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी २०१० ते २०१९ पर्यंत २३८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.





















Join Our Whatsapp Group