पिंपरी (Pclive7.com):- मागील चार वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून भाजपच्या पदाधिका-यांनी पक्षीय राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर अन्याय केला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे जाणीवपूर्वक रखडवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या नेतृत्वात आज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.
चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथे सुमारे तीन तास ही बैठक चालली. आयुक्त साहेब आमच्या प्रभागातील भरपूर कामे बाकी आहेत. पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे आमच्या प्रभागातील प्रलंबित कामे मार्गी लावा असा सूर बहुतांश नगरसेवकांनी यावेळी काढला.
याबैठकी संदर्भात माहिती देताना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले की, ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे जास्त नगरसदस्य निवडून आले आहेत. त्या प्रभागामध्ये जाणीवपूर्वक अंदाजपत्रकामध्ये विकास कामांसाठी जुजबी तरतूद करण्यात आली आहे. सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प नुकताच आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केला आहे. स्थायी समितीने त्यात काही बदल सुचवून महापालिकेकडे मंजुरीसाठी शिफारस केलेली आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसदस्यांना त्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा. त्याच प्रमाणे त्यांच्या प्रभागातील प्रलंबित विकासकामे व प्रस्तावित विकासकामे आयुक्त व वरीष्ठ अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी नगरसदस्य व आयुक्त आणि मनपाचे वरीष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्याची मागणी नगरसदस्य करीत होते. त्या अनुषंगाने आज सोमवार (दि.१५) चिंचवड स्टेशन येथील अँटो क्लस्टर सभागृहात बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या, प्रलंबित व प्रस्तावित विकासकामे व त्यासाठी लागणारा निधी याबाबत सविस्तर चर्चा केली. आयुक्त राजेश पाटील यांनी सर्वांच्या समस्या एकूण घेऊन त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ. प्राधान्याने पाणी पुरवठ्याची समस्या सोडवून पुढील सात-आठ महिन्यात दररोज पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. शहरातील नद्या दोन वर्षात स्वच्छ करणार जलपर्णीची समस्या कायमची निकालात काढणार, मनपाची प्रत्येक निविदा पारदर्शीपणे काढणार असल्याचे सांगितले. तसेच लोकांच्या पैशाचा योग्य विनियोग करण्यात येईल, अनावश्यक कामे थांबविली जातील असेही याप्रसंगी नमूद केले.
या मिटींगमध्ये विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, अजित गव्हाणे, नाना काटे, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, स्वाती काटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेचे नगरसदस्य उपस्थित होते. तर प्रशासन विभागाकडून आयुक्त, अतिरीक्त आयुक्त क्र. १ व ३ तसेच शहर अभियंता उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group