पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी त्यांच्या गटनेतेपदाचा आज (दि.१६) राजीनामा दिला आहे. विभागीय आयुक्तांकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती कलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मिनल यादव, अश्विनी वाघमारे, विशाल यादव, विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते.
शिवसेना पक्ष शिस्तीचा भंग केल्याने आणि पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याने राहुल कलाटे यांना शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी खुलासा मागवत १० फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून कलाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी नुकतीच आठ सदस्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते राहुल कलाटे यांनी पक्षाचा आदेश डावलून आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिले. कलाटे यांनी पक्ष आदेशाचा भंग केला असल्याचा ठपका त्यांच्यावर होता. त्यापार्श्वभूमीवर राहुल कलाटे यांनी त्यांच्या गटनेतेपदाचा राजीनामा आज दिला आहे.






















Join Our Whatsapp Group