पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामधून पवना व मुळा या दोन नद्या वाहतात. गेल्या अनेक दिवसांपासून या नद्यांमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी किवळे युवा मंचच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. रविवारच्या सुटीचा लाभ घेत सभासदांनी अडीच तास श्रमदान करत पवना नदीतील जलपर्णी काढली.
शहरातील किवळे युवा मंचच्या सदस्यांनी पवना जलपर्णी हटाव मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार रविवारी सर्वांनी सुटी असल्याने श्रमदान करत जलपर्णी काढण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला. त्यानुसार आज किवळे घाटावर जलपर्णी काढण्यासाठी तरुण नदीमध्ये उतरले. कोणतेही साधन नतसाना हाताच्या सहाय्यानेच सुमारे अडीच तास जलपर्णी काढण्यात आली. त्यामुळे नदीचा परिसर स्वच्छ दिसू लागला.
जलपूजन करून शिवगर्जना देत मोहिमेची सांगता करण्यात आली. तसेच पुढील रविवारीही या मोहिमेमध्ये सहभाग घेत जलपर्णी काढण्याचा निश्चय युवकांनी यावेळी केला. यामध्ये किवळे ग्रामस्थ, लायन्स क्लब पूना, नाद सह्याद्री व आयसीसी सायकल ग्रुप सहभागी झाले होते.
शहरातील पवना नदीची अवस्था अतिशय वाईट आहे. या नदीमध्ये सांडपाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे परिसरामध्ये डासांचा त्रास वाढला आहे. तसेच पर्यावरणाचाही र्हास होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तरुणांनी एकत्र येत पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचा निर्धार केला आहे. पालिका प्रशासन जेव्हा करेल तेव्हा करेल मात्र आमच्या युवकांच्या हातात जेवढे आहे तेवढे आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करणार आहे.
कुंडलिक आमले – स्थानिक युवक, किवळे.






















Join Our Whatsapp Group