पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई उर्फ नानी घुले यांची आज (दि.२३) बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या पंकज भालेकर यांनी माघार घेतल्याने घुले यांची बिनविरोध निवड झाली.
केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि.१९) अर्ज दाखल केले होते. सत्ताधारी भाजपकडून प्रभाग क्रमांक चार दिघी, बोपखेलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हिराबाई घुले यांचा तर विरोधातील राष्ट्रवादीने तळवडेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल केला होता.
निवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज (दि.२३) रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
अर्जांची छाननी झाली. दोनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. यावेळेत राष्ट्रवादीच्या भालेकर यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या हिराबाई घुले यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रुबल अग्रवाल यांनी जाहीर केले.
उपमहापौर निवडणुकीनंतर महापालिका मुख्यालयात ‘सोशल डिस्टंसिंग’चा फज्जा
पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात उपमहापौर निवडणुकीनंतर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नुकतेच शहरात कडक निर्बंध लागू केलेत. गर्दी करू नये असे सक्त आदेश त्यांनी बजावेत. असे असताना थेट महापालिकेतच आज सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. सर्वसामान्यांना नियम आणि राजकारण्यांना नियम नाहीत का असा सवाल आता उपस्तिथ होत आहे. दरम्यान आता आयुक्त संबधीतांवर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.























Join Our Whatsapp Group