पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्थापन केलेल्या सामाजिक सुरक्षा पथकातील ७ कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बढतीवर बदली झाल्याने त्या जागी एका पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या पथकातील संदीप गवारी, दिपक साबळे, अनंत यादव, संतोष अस्वले, महेश बारकुले, विष्णू भारती आणि मारोतराव जाधव यांची बदली करण्यात आलेली आहे. तर नियंत्रण कक्षातून पिंपरी येथे झालेली बदली रद्द करुन पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांची सामाजिक सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. शहरातील अवैध धंद्यावर या पथकाने मोठ्या स्वरूपात कारवाई केल्या आहेत आणि त्या सुरुही आहेत. असे असताना अचानकपणे या पथकातील सात कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदली केल्याने पोलीस दलात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने त्यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर चौगले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.





















Join Our Whatsapp Group