पुणे (Pclive7.com):- तळेगाव ढमढेरे येथे दोन मुलींसह पित्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. 23) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. रात्री साडेबाराच्या सुमारास मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. राजेंद्र शिवाजी भुजबळ (वय 42), दीक्षा राजेंद्र भुजबळ (वय 10) व ऋतुजा राजेंद्र भुजबळ (वय 8) अशी या पिता-मुलींची नावे आहेत. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील राजेंद्र शिवाजी भुजबळ नोकरीनिमित्त पत्नी व मुलींसह वानवडी, पुणे येथे राहत होते. मंगळवारी राजेंद्र दीक्षा व ऋतुजा या मुलींना सोबत घेऊन, तसेच पत्नीला पुणे येथेच घरी ठेवून तळेगाव ढमढेरे येथे आले होते. त्यांनतर ते अचानक गायब झाले. मात्र सायंकाळच्या सुमारास येथील शेणाचा मळा या ठिकाणी उत्तम भुजबळ यांना आपल्या विहिरीच्या कडेला मोठ्या माणसाच्या व लहान मुलींच्या चपला, मोबाईल, पैसे पडलेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे भुजबळ यांना शंका आल्याने त्यांनी शिक्रापूरचे पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस पाटील पांडुरंग नरके यांनी घटनास्थळी धाव घेत सुमित भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, सागर नरके यांच्यासह काही नागरिकांच्या मदतीने विहिरीच्या पाण्यामध्ये शोधमोहीम सुरू केली. त्यांनतर रात्री साडेबाराच्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group