मुंबई (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याआधीच ४५ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण केलं जात होतं. दरम्यान, “राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकार तयार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
त्यामुळे येत्या १ मे पासून राज्यात होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण मोफत करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आजपासूनच या लसीकरणाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात एकीकडे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना लस देण्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असताना अनेक ठिकाणी लसीचे डोस कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता वाढणाऱ्या लसीच्या डोसची मागणी राज्य सरकार कशी पुरवणार? असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे.
राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील साधारणपणे ५ कोटी ७१ लाख लोकसंख्या असून त्यांना प्रत्येकी दोन या हिशोबाने राज्याला साधारण १२ कोटी डोसची आवश्यकता असेल. त्यानुसारच लसीकरणाचं नियोजन केलं जाईल.






















Join Our Whatsapp Group