पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे उडालेला हाहाकार..ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यासाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट, ते न मिळाल्यामुळे आपल्या जिवलगांनी डोळ्यासमोर सोडलेला जीव या सर्व घटनांनी मागील दीड महिन्यांपासून राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात अक्षरशः तांडव माजवला आहे.
ही भयाण परिस्थिती हाताळण्यात शासकीय यंत्रणा अपुरी पडत असताना या यंत्रणेला हातभार लावण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरीतील भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला स्वखर्चातून ५० फाऊलर बेड, ४ व्हेंटिलेटर व २ हाय फ्लो ही उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.
त्याचा लोकार्पण सोहळा आज पिंपरीतील जिजामाता रुग्णालय येथे संपन्न झाला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, आयुक्त राजेश पाटील, नगरसेवक राहुल कलाटे, नारायण बहिरवाडे, कुणाल लांडगे, संतोष कुदळे, अॅड. अनंत रणदिवे, डॉ. होडकर, डॉ. संगीता तिरूमनी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संदीप वाघेरे म्हणाले की, ज्यावेळेस जंगलाला आग लागते त्यावेळेस एक चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन ती आग विझवण्याचे प्रयत्न करते. इतर प्राणी चिमणीला विचारतात की तू हे काय करत आहेस. त्यावेळी चिमणी उत्तर देते की ज्यावेळेस या जंगलाच्या आगीचा इतिहासामध्ये उल्लेख होईल त्यावेळेस माझे नाव आग लावणारेमध्ये येणार नसून आग विझवणाऱ्यांमध्ये नोंद ठेवली जाईल. याच भावनेतून मी हा छोटासा प्रयत्न करीत आहे.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका रुग्णालयाला उपलब्ध करून दिलेल्या उपकरणांमुळे फार मोठे सहकार्य मिळाले आहे. त्यांच्या या उपक्रमापासून शहरातील इतर लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन घेऊन महापालिकेला सहकार्य केल्यास कोरोनाविरोधातील लढ्याला नक्की बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.