लस उपलब्ध नसल्याने ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना १ मे रोजी लसीकरण होणार नाही
पिंपरी (Pclive7.com):- कोविड -१९ आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध उपायायोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांपैकी नागरिकांचे कोविड -१९ लसीकरण करणे हा महत्वाचा घटक आहे. दि.०१ मे पासून भारत देशामध्ये तसेच सर्व राज्यांमध्ये वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटामधील नागरीकांचे कोविड -१९ लसीकरण करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले आहे.
या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना तीन केंद्रांवर लसीकरण होणार असून पूर्व नोंदणी केलेल्या २०० लाभार्थ्यांनाच दररोज लस मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रासाठी ०३ कोविड लसीकरण केंद्रे –
१) नवीन भोसरी रूग्णालय, २) नवीन जिजामात रूग्णालय, ३) प्रेमलोक पार्क दवाखाना या तीन केद्रांची लसीकरणासाठी निवड करण्यात आलेली आहे.
सदर केंद्रावर फक्त पुर्व नोंदणी केलेल्या उपरोक्त वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुर्व नोंदणी केलेल्या २०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. याकामी नागरीकांनी/लाभार्थ्यांनी http://www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी नसलेल्या १८ ते ४४ या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही.
तसेच दि.१ मे रोजी रोजी लस साठा शिल्लक नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, फक्त नोंदणी केलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी ३ लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे.
तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे. असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group