पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्राने नुकताच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने सध्या शहरात सध्या आठ ठिकाणी या वयोगटातील लसीकरण ऑनलाईन बुकिंग पद्धतीने चालू आहे. यमुनानगर ठाकरे मैदान येथील स्केटिंग रिंग मध्ये १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना सुद्धा लसीकरण लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे अशी आग्रही मागणी पुन्हा नगरसेवक उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात उत्तम केंदळे यांनी म्हटले आहे की, प्रभागातील बहुतांश ज्येष्ठ आणि ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घेतल्या आहेत. १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना सुद्धा लस लवकर द्यावी अशी मागणी प्रभागात सुद्धा होत आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारची भौतिक सुविधा व व्यवस्था स्केटिंग रिंग मध्ये उभारण्यात आल्या आहे असे केंदळे यांनी सांगितले आहे.
यमुनानगर ठाकरे मैदान मधील स्केटिंग रिंग मध्ये लसीकरण केंद्र चालू करावे अशी मागणी नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांनी १६ मार्च २०२१ रोजी आयुक्त यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने २३ मार्च २०२१ रोजी प्रत्यक्ष ठाकरे मैदान वरील लसीकरण केंद्र पालिकेच्या माध्यमातून चालू करण्यात आले.
आतापर्यंत तब्बल नऊ हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. सर्व सुविधा युक्त सुसज्य उभारलेले लसीकरण असल्याने प्रभागातील तसेच इतर भागातील नागरिक लस घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. नागरिक या लसीकरण केंद्र उपक्रम व नियोजनाचे कौतुक करत असल्याचे उत्तम केंदळे यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group