पिंपरी (Pclive7.com):- लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही, त्यातही तिसर्या लाटेत लहान मुलांना व १८ वर्षापर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका जास्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची निर्मिती करावी, अशी मागणी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महापालिकेचे आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात विलास लांडे यांनी म्हटले आहे की, कोविड संसर्गाचा (Covid infection) धोका सातत्याने वाढत आहे. कोरोना ( Coronavirus) तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे लहान मुलांना कोविड संसर्गापासून लांब ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतात कोरोनाची तिसरी लाट साधारणतः जुलै महिन्यापर्यंत येऊ शकते. या लाटेचा परिणाम हा लहान बालकांवर पहिल्या दोन लाटांपेक्षा थोडा अधिक होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन महानगरपालिकेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी सुरु करावी.
तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची निर्मिती करून त्यात ज्या बालकांचे पालक कोरोनावर उपचार घेत आहेत, अशा बालकांसाठी बालसंगोपन केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group