पिंपरी (Pclive7.com):- शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च, आकुर्डी महाविद्यालयाला गुणवत्तेचे ISO २१००१:२०१८ मानांकन मिळाले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाविद्यालयाला विविध मानांकन मिळालेले आहेत. यामध्ये नॅकचे मूल्यांकन, तसेच ए.आय.सी.टी.ई.–सी.आय.आय. सर्वे अंतर्गत सिल्व्हर मानांकन व आता गुणवत्तेचे ISO २१००१:२०१८ मानांकन प्राप्त झाले आहे.
आयएसओ 21001 हि फक्त शैक्षणिक क्षेत्रासाठी जगातील प्रथम आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन प्रणाली आहे. आयएसओ 21001 शैक्षणिक संस्था, विध्यार्थी आणि इतर संबंधित असलेल्या घटकांमधील विशिष्ट परस्पर संवाद यावर लक्ष केंद्रित करते. आयएसओ 21001: 2018 हे उच्चस्तरीय गुणवत्तेशी संबंधित असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच आयएसओ 21001: 2018 हे अध्यापन, शिक्षण व संशोधन याद्वारे कार्यक्षमतेच्या विकासास समर्थन देते. हे महाविद्यालय स्थापन झाल्यापासून त्याचा प्रगतीचा आलेख नेहमी उंचावत राहिला आहे.
हे मानांकन महाविद्यालयाला उत्कृष्ट निकालातील सातत्य, अद्यावत सुविधा, नाविन्यपूर्ण अध्यापन प्रक्रिया, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विध्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या संधी, विविध संस्था तसेच उद्योग आस्थापनांसोबत केलेले परस्पर सहकार्य करार, या करारांच्या माध्यमातून मिळालेले निकाल व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे प्रयत्न या निकषांच्या आधारांवर प्राप्त झाले आहे. ISO २१००१:२०१८ मानांकन मिळवणाऱ्या मोजक्याच शैक्षणिक संस्थांचा यादीमध्ये महाविदल्याचा समावेश झाला आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील यांच्या प्रभावी नेतृत्व, उत्कृष्ट नियोजन तथा मार्गदर्शनामुळे हे यश महाविद्यालयाला प्राप्त झाले. महाविद्यालयाचे ISO समन्वयक डॉ.सुनील डंबारे व डॉ. मनीषा भेंडे तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागाचे प्रमुख, उपकुलसचिव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाला हे यश मिळवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या यशासाठी डॉ.डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे चेअरमन सतेज पाटील, संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील व प्रभारी संचालक डॉ.नीरज व्यवहारे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.