पिंपरी (Pclive7.com):- महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कष्टकरी जनतेच्या शिष्टमंडळास भेट नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्याने गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रिक्षा चालक, फेरीवाले, घरकाम महिला गटाई कामगार यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आज कष्टकरी जनता आघाडी वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर आंदोलन सुरू करण्यात आले. कष्टकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही तर उद्रेक होईल असा इशारा कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यावेळी दिला आहे.
धुणीभांडी स्वयंपाक करणाऱ्या महिला रिक्षाचालक, फेरीवाले, गटई कामगार, जिम ट्रेनर यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु मनपा आयुक्त आणि त्याचे प्रशासन या योजनेत खोडा घालत आहेत. मनपाच्या या लहरी कारभाराविरोधात कष्टकरी जनतेच्या वतीने आज दि.१४ रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.
कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, टपरी, पथारी, हातगाडी पंचायत, घरकाम महिला सभा, रिक्षा ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिता सावळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, शहराध्यक्ष रमेश शिंदे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेडचे प्रमुख बाळासाहेब ढवळे, शहराध्यक्ष धनंजय कुदळे, विजय ढगारे, अविनाश जोगदंड, लक्ष्मण शेलार, तुषार लोंढे, जाफर भाई शेख, सिद्धेश्वर सोनवणे, सुरज सोनवणे, अजय साळवे, प्रदीप अहिरे, नंदलाल निकम आदी सहभागी झाले होते.
Covid-19 मुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेले गोर-गरीब आर्थिक दुर्बल घटकांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिकेकडून जाहीर करण्यात आला होता. परंतु अशी मदत करता येणार नाही असे मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केले. यामुळे कष्टकरी बहुजन मागासवर्गीय जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आमच्या गरीबीची थट्टा केली जात असून आहे.
आर्थिक अडचणीमध्ये असताना आम्हाला हिणवले जात आहे. आमचा अपमान केला जात आहे. आम्ही कष्ट करतो, सन्मानाने जगतो आम्हाला कमजोर समजू नका, आर्थिक मदत मिळाली नाही तर उद्रेक होईल असा इशारा यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.