पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात गुरुवार (दि.१) पासून ‘पे अँड पार्क’ योजना सुरू केली आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांचा विरोध लक्षात घेऊन त्याची कठोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. तसेच, लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गेल्या ५ दिवसांत वाहनचालकांकडून ३० हजार रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न महापालिकेकडे जमा झाले आहे.
महापालिकेने पार्किंग पॉलिसी तयार करून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच, सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनीही विरोध केला आहे. विविध सामाजिक संघटना त्याविरोधात आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने ती योजना शहरात सुरू केली. ‘पे अँण्ड पार्क’ला वाहनचालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सध्या दुपारी चारनंतर लाकडाऊन सुरू आहे. वाहनांची वर्दळ कमी झाल्याने चारनंतर प्रतिसाद कमी होतो.
रविवारी (दि.४) साप्ताहिक सुटीनिमित्त शुल्क वसुली बंद होती. विरोध आणि अल्प प्रतिसादामुळे मोजक्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू आहे. गेल्या ५ दिवसांत ३० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न महापालिकेस मिळाले आहे. हळूहळू वाहनचालकांचा प्रतिसाद वाढून शुल्क देण्यास कल वाढणार आहे. परिणामी, महापालिकेचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास महापालिकेच्या अधिका-यांनी व्यक्त केला. तर, दुसरीकडे नो पार्किंगमध्ये लावलेली वाहन जप्त करण्याची वाहतूक पोलिसांची मोहीम थंड असल्याचे चित्र आहे.






















Join Our Whatsapp Group