पिंपरी (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थसहाय्य करत असलेल्या पीएमपीएमएलच्या वतीने पुणे शहरात १० रुपयांत दिवसभर कुठेही फिरा, ही प्रवास योजना आजपासून सुरु केली आहे. पिंपरी महापालिकेच्या सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनास शहरात ही योजना का राबविता येत नाही, असा सवाल करत पिंपरी-चिंचवड शहरातही ही योजना तत्काळ सुरु करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली.
याबाबत महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात विरोधी पक्षनेते मिसाळ यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील पूर्वश्रमीची पीसीएमटी आणि पीएमटी या दोन संस्थाचे विलनीकरण करुन पीएमपीएमएल कंपनीची स्थापना करण्यात आली. पीएमपीएमएल पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी कार्यरत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आपला हिस्सा पीएमपीएमएला देते. या दोन संस्थाचे विलनीकरण झाल्यापासूनच पिंपरी- चिंचवड शहरावर बसमार्ग असो अथवा पूर्वश्रमीच्या पीसीएमटीच्या कर्मचा-यांची पदोन्नती असो, अथवा बदल्यांचा विषय असो स्थरावर कायमच अन्याय केला जात आहे.
आता सुध्दा पुणे शहरासाठी पीएमपीएमएलची दहा रुपयांत कुठेही दिवसभर फिरा हि योजना आजपासून सुरु होत आहे. या योजनेसाठी पुणे शहरातील ९ मार्ग निश्चित केले असून ५० मिडी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये संपूर्ण पुणे शहरासाठी ३०० बसेस उपलब्ध झाल्यानंतर या योजनेचा विस्तार केला जाणार आहे.
पुणे महापालिकेतील पदाधिकारी व प्रशासनास ही योजना राबविता येते तर पिंपरी महापालिकेच्या सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनास शहरात ही योजना का राबविता येत नाही?, असा सवाल मिसाळ यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेचे सत्ताधारी पदाधिकारी नागरीकांच्या फायद्याच्या योजना राबविण्याचे सोडून ‘पे अँड पार्क’सारख्या योजना राबवून नागरीकांना वेठीस धरणाऱ्या व भूर्दड बसविणा-या योजना राबविन्यात धन्यता मानत आहेत. जे पुण्याच्या पदाधिका-यांना जमू शकते ते पिंपरी-चिंचवडच्या सत्ताधारी पदाधिका-यांना का जमू नये, असा सवालही त्यांनी केला.