पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील गट नंबर ६६९ या ठिकाणी रहिवासी विभागात जुना आळंदी रोड येथे प्लास्टिक उत्पादन करणारी समर्थ इंटरप्राईजेस कंपनी आहे. या कंपनीतुन होणाऱ्या प्लॅस्टिकच्या उत्पन्नातून तेथील रहिवाशांना अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या संदर्भात एप्रिल महिन्यात महानगरपालिकेला अर्ज देऊन कंपनी बंद करण्याची मागणी देखील केली. महानगरपालिकेने कंपनीकडून सात दिवसात खुलासा मागवला. परंतु कंपनीने अत्यंत चुकीचा खुलासा पालिकेकडे सादर केला आहे. अशी माहीती पत्राद्वारे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी दिली आहे.
ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कंपनीने दोन खिडक्या बंद केलेल्या आहेत. सर्व खिडक्या व शटर बंद करण्याचा कंपनीचा खुलासा खोटा व चुकीचा आहे. कंपनीने बाहेरच्या बाजूस लावलेल्या यंत्रामुळे खूपच आवाज येतो. विशेष करून रात्रीच्या वेळेस त्यांचा खूप त्रास होतो त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते.
कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेनुसार प्लास्टिक तयार होत असताना उग्र वास येतो तो हवेत पसरल्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवतो. त्यामुळे वायू प्रदूषण होत आहे. कंपनीच्या पश्चिम बाजूस गटार लाईन आहे. त्यामधून केमिकल मिश्रीत द्रव्य सोडला जातो. त्यामुळे तेथील जल प्रदूषण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
कंपनीत यापूर्वी दोन वेळा स्फोट झालेले आहेत. तरीही कंपनीने प्रशासकीय अधिकारी किंवा पोलिस खात्यास याची कल्पना न देता माहिती दाबून ठेवली. आग लागल्यास कंपनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने साईडला जागा सोडलेली नाही.
कंपनीच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा नसल्यामुळे कंपनी रस्त्याच्या अर्धा भाग वापरून त्या ठिकाणी येणार्या जाणार्या गाड्यांना अडथळा निर्माण करत आहे. कंपनीने मशीन शिफ्टिंग साठी एम.आय.डी.सी.मध्ये जागा बघून मशीन स्विफ्ट करण्याचे आश्वासन पोकळ आहे.
कंपनी मालक व प्रशासकीय अधिकारी यांचे संगनमत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सात दिवसाच्या आत योग्य ती कारवाई न केल्यास सर्व रहिवासी आंदोलन करतील व आंदोलनात काही घटना घडल्यास त्याला आपले कार्यालय जबाबदार राहील असेही आल्हाट यांनी पत्रात म्हटले आहे.
– धनंजय मुरलीधर आल्हाट : शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख