पिंपरी (Pclive7.com):- पुणे, पिंपरी-चिंचवडकरांची प्रवास वाहिनी असलेली पुणे-लोणावळा-पुणे रेल्वेच्या कोरोनामुळे दोन फेऱ्या सुरू होत्या. मात्र, आता याच मार्गाच्या पाच फेऱ्या वाढविण्यात आल्या असून कामगार, छोटे उद्योजक यांना दिलासा मिळणार आहे.
पूर्वी या मार्गावर पंधरा फेऱ्या सुरू असायच्या मात्र, सध्या पाच फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामुळे लोणावळा ते पुणे चाकरमानी मंडळी, लघु उद्योजक, व्यापारी यांना दिलासा मिळणार आहे. नागरिक, प्रवासी यांच्या अडचणी व मागणी लक्षात घेऊन दापोडी येथील रेल्वे बोर्ड सदस्य विशाल वाळुंजकर यांनी पुणे डिव्हिजन रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा यांच्याशी पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत व रेल्वेच्या विविध समस्यांबाबत भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले होते.
पुणे-लोणावळा हे पर्यटन, शिक्षण, व्यवसाय, उद्योजक, दूध व्यवसाय करणारे इतर सर्व क्षेत्रातील दोन डोस पूर्ण असलेल्या प्रवाशांना पुणे-लोणावळा लोकल प्रवास चालू करण्यात यावा. रेल्वे स्थानकावर कोरोना ‘अँटी रॅपिड टेस्ट’ व ‘व्हॅक्सिनेशन’ चालू करण्याची मागणी रेल्वे प्रवासींनी केली आहे. तर स्थानकावरील इतर सोयीसुविधा, सुशोभीकरण अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत डी. आर. एम. रेणू शर्मा यांनी पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या जसजसे लसीकरण होईल. तसे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फेऱ्यांमधे वाढणार असल्याचे सदस्य विशाल वाळुंजकर यांना सांगितले.
दोन डोस पूर्ण असलेल्या प्रवाशांना वाढत्या मागणीनुसार लोकल फेऱ्या वाढविण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकावर कोरोना ‘अँटी रॅपिड टेस्ट’ आणि ‘व्हॅक्सिनेशन’ स्थानिक मनपा प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळाल्यास चालू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनवरील स्वच्छता, महिला सुरक्षा विषयी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी सुधीर चव्हाण, धर्मेंद्र शिरसागर, विशाल सातपुते, राजू कानडे आदी उपस्थित होते.