तामिळनाडू (Pclive7.com):- तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला आहे. दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे जखमींना उपचारासाठी वेलिंग्टन येथील लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिपीन रावत यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीसंबंधी माहिती देण्यात आलेली नाही.
एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं. स्थानिकदेखील या बचावकार्यात सहभागी झाले होते. अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत होत्या.
या हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास होते. यामध्ये बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या.
हवाई दलाकडून चौकशीचा आदेश
हवाई दलाने बिपीन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं हवाई दलाने सांगितलं आहे.
दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.