पिंपरी (Pclive7.com):- महाविकासआघाडी असल्याने आता तिकीट वाटप कसं होणार अशी तुम्ही चर्चा करत असाल. काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय. हे मी नव्हे तर त्यांनीच आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय. कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्ये कोणाचं किती बळ आहे आणि कोणाचं काय आहे? याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचं बळ चांगलं आहे, अशाच आपण प्रत्येकाला शुभेच्छा देऊयात. पण शिवसेनेची इथं राष्ट्रवादी सोबत जाण्याची तयारी आहे, असं मी बातमीत वाचलं. ज्यावेळी आपले मित्र पक्ष समन्वयाची भूमिका घेतात, तेव्हा आपण ही दोन पावलं मागे जात पुढं जायचं असतं. तशी मानसिकता आपण ठेवायची असते. असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलयं.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरात आज अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळण्याची सेटिंग लावण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात कान टोचले आहेत. आता मान खाली घालून हसू नका. विरोधकांना मदत करणं बंद करा. आधी तसले धंदे बंद करा, अशा शब्दात अजित पवार यांनी खास आपल्या स्टाईलने या भावी नगरसेवकांचे कान उपटले.
राष्ट्रवादीचे काही इच्छुक उमेदवार अजित पवारांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी अजितदादांनी त्यांना खास आपल्या शैलीने फटकारले. गट तट बाजूला ठेवा. विरोधकांना मदत करणं बंद करा. मला पिंपरी चिंचवड शहरातील खडानखडा माहिती आहे. आता खाली माना घालून हसू नका. आधी तसले धंदे बंद करा, असा सज्जड दमचं पवारांनी या कार्यकर्त्यांना भरला.
मी इथं आलो तर मला लगेच गराडा घातला. दादा बघा, दादा बघा… आता का बघा? तर निवडणुका जवळ आल्या म्हणून बघा. दादांचं माझ्याकडे लक्ष आहे का? हे आता बघतायेत. आता त्यांना चुकल्याचं कळतंय, असं फटकारतानाच पण ठीक आहे. मी सर्वांना सोबत घेऊनच पुढं जाणार आहे, असं म्हणत अजितदादांनी या कार्यकर्त्यांना गोंजारण्याचा प्रयत्नही केला.
जे आपल्या सोबत येऊ इच्छितात त्यांनी राष्ट्रवादीची आणि स्वतःची इथं किती ताकद आहे हे पाहावं. त्या ताकदीच्या प्रमाणावर जागा वाटप झालं तर आपली काहीच हरकत नाही. एखादया ठिकाणी ते एक-दोन पावलं मागे होतील, एखादया ठिकाणी आपण एक-दोन पावलं मागे होऊयात. शेवटी आपलं सर्वांचं पहिलं ध्येय पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपची सत्ता घालवायची हेच आहे. त्यामुळे ही भूमिका घेऊन तुम्हाला आणि मला पुढं जायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.























Join Our Whatsapp Group