पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून पाचवी आणि आठवीचे असे एकूण १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर एक महिना उलटूनही अंतिम निकाल प्रसिद्ध होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटरवर निकाल जाहीर करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील पाचवीच्या वर्गामधून ३ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार २०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ८६५ विद्यार्थी पात्र ठरले तर १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. पाचवीमधून महापालिकेच्या पिंपळे गुरव प्राथमिक शाळेमधून मृणाली प्रमोद सकपाळ या विद्यार्थिनीने ८८.६६ टक्के गुण प्राप्त करत मनपा शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर नैतिक रवी ठाकरे हिने ८३.३३ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
इयत्ता८ वी च्या वर्गांमधून ३ हजार १३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले. त्यातून १ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी केवळ २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. रहाटणी येथील कन्या शाळा क्रमांक ५५ मधील संजना राजेंद्र मांगवडे हिने ७८ टक्के गुण मिळवित महापालिकाशाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मोशी कन्या प्राथमिक शाळेतील नंदिनी रमेश भालेकर हिने ७०.६६द्वितीय क्रमांक मिळविला.