पुणे (Pclive7.com):- पुण्यात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले.

किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.
पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.
सोमय्या आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार केली. तिथून पालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी ते आले असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आणि सगळा प्रकार घडला.
हल्ल्यावर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केलंय. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.”
दरम्यान, किरीट सोमय्या या हल्ल्यानंतर संचिती हॉस्पिटलला दाखल झालेत. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.























Join Our Whatsapp Group