पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत श्रीनिवास कलाटे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज जाहीर प्रवेश झाला. श्रीनिवास कलाटे यांच्या प्रवेशाने वाकड परिसरात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे.
यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, चिंचवड विधानसभा प्रभारी संतोष कलाटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, शहर उपाध्यक्ष विक्रम कलाटे, राम वाकडकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल कलाटे, आकाश बोडके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीनिवास कलाटे हे एक यशस्वी युवा उद्योजक आहेत. सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलेले आहे. त्यांच्याकडे तरुणांचे मोठे संघटन आहे. श्रीनिवास कलाटे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी गेली काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर कलाटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.