पिंपरी (Pclive7.com):- ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिकेची आगामी निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडणूक लढण्याची ३८ जणांची संधी हिरावली जाणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांना आता ११४ जागांवर खुल्या प्रवर्गातून लोकप्रतिनिधी निवडावे लागतील. ओबीसी आरक्षण नाकारल्याचा सर्वाधिक फटका कुणबी, माळी समाजाला बसणार आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ३५ जण ओबीसी प्रवर्गातून निवडून आले होते. त्यात भाजपच्या सर्वाधिक नगरसेवकांचा समावेश आहे.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तीनसदस्यीय ४५, तर चारसदस्यीय एक असे एकूण ४६ प्रभाग आहेत. १३९ नगरसेवकांपैकी ६९ पुरुष तर ७० महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. १३९ नगरसेवकांपैकी ३ जागा अनुसूचित जमाती (एसटी) साठी तर २२ जागा अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव असतील. ओबीसी आरक्षण मिळाले असते, तर ३८ जागा ओबीसींसाठी राखीव राहिल्या असत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची ३८ जणांची संधी हिरावली गेली आहे. त्यामुळे आता ११४ जागांवर खुल्या प्रवर्गातून लोकप्रतिनिधी निवडावा लागणार आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) साठी ३५ जागा राखीव होत्या त्यात भाजपच्या स्वीनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, नितीन काळजे, सुवर्णा बुर्डे, हिराबाई घुले, सागर गवळी, सारिका लांडगे, संतोष लोंढे, नम्रता लोंढे, केशव घोळवे, योगिता नागरगोजे, उत्तम केंदळे, नामदेव ढाके, सुरेश भोईर, जयश्री गावडे, संदीप वाघेरे, दिवंगत अर्चना बारणे, तुषार कामठे, सविता खुळे, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, आशा धायगुडे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, राष्ट्रवादीचे राहुल भोसले, प्रवीण भालेकर, पौर्णिमा सोनवणे, दिवंगत जावेद शेख, राजू मिसाळ, प्रज्ञा खानोलकर, अपर्णा डोके, श्याम लांडे, विनोद नढे, शिवसेनेच्या रेखा दर्शले, अपक्ष झामाबाई बारणे आदी ३५ नगरसेवक ओबीसी प्रवर्गातून निवडून आले होते. त्यात सर्वाधिक कुणबी आणि त्या खालोखाल माळी समाजाच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. ओबीसी आरक्षण मिळणार नसल्याने त्यांना आता खुल्या प्रवर्गातून लढावे लागणार आहे. मात्र, खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढविणे आणि जिंकणे जिकरीचे आणि आव्हानात्मक असेल.
पिंपरी चिंचवड शहरातील काही पट्ट्यात कुणबी, माळी समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढविणे अशक्य नाही. मात्र, निवडून येण्यासाठी त्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागेल. इतर जातीच्या नगरसेवकांची अधिक फरफट, अडचण होऊ शकते. स्थानिक राजकीय गणिते, नातीगोती, मॅन – मनी – मसल पॉवर यांच्यापुढे त्यांचा निभाव लागणे मुश्कील आहे. ओबीसी आरक्षण नसल्याने ११४ जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल. त्यामुळे अनेक विद्यमान आमनेसामने येण्याची शक्यता आहे. यापूर्वी नातीगोती जपत समोरासमोर येणे टाळले जात होते. एकजण खुल्या प्रवर्गातून, तर दुसरा ओबीसीतून लढत होता. आता ओबीसी आरक्षण नसल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांच्या लढती रंगतील, असे चित्र आहे.
























Join Our Whatsapp Group