पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात पवना नदी सुमारे ३२ किमी क्षेत्रातून वाहते, या नदीचा बहुंताश प्रवाह पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव या परिसरात आहे. पूर्वीच्या प्रभाग क्र.२१ मध्ये काही रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. या कामामधून निघणारा डबर, राडारोडा, संबधित ठेकेदार पर्यावरणाचे नियम न पाळता थेट नदीत टाकत आहेत. त्यामुळे आधिच प्रदूषित झालेल्या पवना नदीत आणखी प्रदूषण होत आहे. तसेच राडारोड्यामुळे नदीचे पात्रही अरुंद होत चालले आहे. संबधित ठेकेदारावर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील व पर्यावरण विभागाचे सह.शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
पिंपरी परिसरात प्रभाग क्र.२१ मध्ये तसेच पिंपरीगावच्या काही भागात सध्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरु आहे. हे काम जे.पी.एन्टरप्रायजेस या ठेकेदारास मिळाले असून संबंधित ठेकेदार व अधिकारी काँक्रीटीकरणाचे हे काम करीत असताना पर्यावरणाचे प्रदूषण न होण्याचे सर्व नियम, कायदे धाऱ्यावर बसून मनमानीपणे रस्त्यातून निघणाऱ्या राडारोडा, डबरचे योग्य नियमांनुसार विल्हेवाट न लावता महापालिकेला तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला फसवण्याचे काम करत आहेत.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नदीप्रदुषण रोखण्यासाठी राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियमावली तयार केलेली असून संबंधित ठेकेदार हा अधिकाऱ्यांशी संगनमत करून महापालिकेने बनविलेल्या नियमावलीचा राजरोसपणे भंग करीत आहे. हि अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब असून महापालिकेने याची तत्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हि केली आहे.