पिंपरी (Pclive7.com):- सत्ताधारी भाजपाने सत्तेचा गैरवापर करीत स्मार्ट सिटीतील कंत्राटे नातेवाईकांना देऊन कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. भामा आसखेड पाण्याचे काय झाले?, बोगस एफडीआर प्रकारणात ठेकेदारांना पाठिशी घालणाऱ्या तसेच श्वानांच्या नासबंदीत देखील भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपला घरचा आहेर दाखविल्या शिवाय गत्यंतर नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी थेरगावातील सभेत केले.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी व बूथ कमिट्या सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रभाग निहाय संपर्क अभियानाची सुरुवात थेरगाव येथील बैठकीपासून गुरुवारी (ता.२४) केली. या अभियानाद्वारे प्रभागातील नागरिकांच्या समस्यां जाणून घेणे, त्या सोडविणे, राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्याबाबत जनजागृती करणे व भाजपने केलेली चुकीची कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन करण्याबाबत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित संपर्क अभियानात ते बोलत होते.
यावेळी रविकांत वरपे, भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नाना काटे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, विनोद नढे, मयूर कलाटे, शमीम पठाण, अपर्णा डोके, श्रीधर वाल्हेकर, संतोष बारणे, विशाल वाकडकर, सतीश दरेकर, कैलास बारणे, राजेंद्र साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तविकपर भाषणात माया बारणे म्हणाल्या की, २०१७ ला ‘ना भय, ना भ्रष्टाचार’.. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार करणार अशी विविध अश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपला पाच वर्षात कुठलेही आश्वासन पूर्ण करता आले नाही. मावळ मधील शेतकऱ्यांशी चर्चा करून पवनेचे पाणी बंद जलवाहिनीद्वारे शहराला देणार, अनाधिकृत बांधकामे नियमित करणार, संपूर्ण शास्तीकर माफ करणार ह्या आश्वासनांचे काय झाले? पारदर्शक कारभार करण्याऐवजी भाजपने खुलेआम भ्रष्टाचाराचा कळस केला. आशिया खंडात श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या महापालिकेेेत इतिहासात स्थायी सभा चालू असताना एसीबीची धाड पडली. स्थायी समिती अध्यक्षांना अटक झाली. त्यामुळे महापालिका व शहर बदनाम करण्याचे काम भाजपने केले आहे असे घणाघाती आरोप त्यांनी केले.
कृत्रीम पाणी टंचाई निर्माण करून टँकर माफियांना पोसले, शहरातील उर्वरीत ४० टक्के भागासाठी २४x७ पाणी पुरवठा करण्याची निविदा काढली. संबंधित ठेकेदाराला आत्तापर्यंत सहा वेळा मुदतवाढ व १०६ कोटी रुपये दिले असे असूनही यातून अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही. राष्ट्रवादीची सत्ता असताना स्वच्छतेच्या बाबतीत शहराचा देशात नववा नंबर होता. आता स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्चूनही पहिल्या दहामध्ये देखील शहराचे नाव नाही, ही शोकांतिका आहे.
अनाधिकृत बांधकामे व शास्ती कराचा प्रश्न सोडविण्यात भाजपला अपयश आले असे आरोप करीत महापालिकेत १५ वर्षे राष्ट्रवादीची सत्ता असताना अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम झाले. शहरातील प्रशस्त रस्ते, उड्डाण पूल, खेळाचे मैदाने विविध हॉस्पिटल, ग्रेड सेपरेटर, उद्याने, जलतरण तलाव, नाट्यगृहे अशी विविध विकासकामे करून शहराची मान उंचविण्याचे काम राष्ट्रवादीने केले याचा उल्लेख मनोगतातुन मान्यवरांनी केला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शास्ती कर वगळून मूळ टॅक्स भरण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला. त्यामुळे शहरातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्राधिकरण बरखास्त करून प्राधिकरणाच्या जागेतील बांधकामे मूळ मालकांच्या नावावर करणे अशी महत्वाची कामे अजितदादा यांनी मार्गी लावली.
यावेळी गोरक्षणाथ पाषाणकर, प्रशांत सपकाळ, सीमा शेलार, संभाजी बारणे, विशाल पवार, अक्षय बारणे यांनी संयोजन केले. ऋषीकेश काशीद यांनी सुत्रसंचलन केले. अभिजित आल्हाट यांनी आभार मानले.
Tags: अजित गव्हाणेचिंचवड विधानसभाथेरगावपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसभाजपाचा भ्रष्टाचारमाया बारणेस्मार्ट सिटी






















Join Our Whatsapp Group