
पिंपरी (Pclive7.com):- इंद्रधनुष्यातील सातही रंगा सोबत आणखी असंख्य रंगांच्या छटा जणू धारित्रीवर उतरल्या आहेत आणि चिमुकली बोटं आणि त्यामध्ये असलेले ब्रश त्या रंगांचा आनंद शुभ्र पांढऱ्या छत्रीवर मनमुराद घेत आहेत असं अत्यंत विलोभनीय चित्र आज चिखली-मोशी मध्ये दिसलं. निमित्त होतं ते अंब्रेला पेंटिंगची कार्यशाळा.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव मिळावा. विद्यार्थ्यांच्या सुपीक कल्पनेतून नवाविष्कारांची निर्मिती व्हावी याच उद्देशाने इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून “माझी छत्री – माझी चित्रकला” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संचालिक डॉ. संजय सिंग यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध कॅलिग्राफी कलाकार पद्मश्री पुरस्कार विजेते श्री अच्युत रामचंद्र पालव यांनी विविध रंगछटा कशा साकारतात, याचे मार्गदर्शन देऊन कला आपल्याला शून्यातून शांतीकडे कशी घेऊन जाते याचे महत्त्व सांगितले.

श्री. पालव यांनी स्वतः अनेक प्रात्यक्षिके दाखवत, ब्रशचे वेगवान फटकारे मारत, उपस्थित्यांची तर मनं जिंकली. पण सोबत पावसाची गाणी, हातात ब्रश आणि पाहिजे तस रंगवण्याची मुक्त परवानगी, यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वहात होता. विद्यार्थ्यांनी साध्या छत्र्यांना रंगीबेरंगी रंग, आकर्षक नक्षी आणि कल्पक रचना वापरून सुंदर कलाकृतींमध्ये रूपांतरित केले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसोबत संस्थापक संचालिका श्रीमती कमला बिष्ट, संस्थापक संचालक डॉ. संजय सिंग, कु. शोभना सिंग तसेच शाळेच्या प्राचार्या, शिक्षक यांनी देखील छत्रींवर चित्रकला साकारून सक्रिय सहभाग नोंदविला. देवदत्त फोटोग्राफी स्कूल चे संचालक श्री देवदत्त कशाळीकर, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष श्री प्रशांत पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

श्रीमती कमला बिष्ट यांनी, कला आपल्याला स्वतःला शोधण्याची आणि त्याच वेळी स्वतःला विसरण्याची संधी देते. या थॉमस मर्टन यांच्या उक्तीची आठवण करून दिली.
स्वतः रंगवलेली अशीच सुंदर छत्री घेऊन निसर्ग आणि कलाविष्कार याचा अनोखा संगम करत, आपल्या कलाकृतीचा आनंद, विद्यार्थ्यांनी स्वतः रंगवलेल्या सुंदर छत्र्या घेऊन पावसात नृत्य करून उपक्रमाची सांगता झाली.






















Join Our Whatsapp Group