पिंपरी (Pclive7.com):- आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आरपीआयला ३९ जागा मिळाव्यात आणि उपमहापौर पदही मिळावे. तसेच येणाऱ्या पालिका निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणार आहोत. मुंबईतून शिवसेनेच्या हातातून सत्ता घेण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.०३) सत्ता संकल्प मेळाव्या करिता रामदास आठवले शहरात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आठवले पुढे म्हणाले की, यावेळी भाजपा आणि आरपीआय एकत्र आले तर शिवसेनेला मोठा धक्का देण्याचे उद्दिष्ट्य आहे. भाजपा सोबत शिवसेनेने निवडणूक लढवली, पण नंतर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी पाठीत खंजीर खुपसला. राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला आमचा पाठिंबा आहे. शिवसेनेने अजूनही विचार करावा, लोकांच्या मनात नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळेच चार राज्यात भाजप जिंकले. २०२४ मध्ये ४०० हुन अधिक जागा एनडीए जिंकेल असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
आता शिवसेना बरोबर आली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप आरपीआय सत्तेत येईल. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जातीयवादी पक्ष म्हंटले आहे, त्याचा अर्थ शरद पवार जातीयवाद करतात असा नाही. पण त्यांच्या खालचे नेते मात्र जातीयवाद करतात हे भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीच्या वेळी स्पष्ट झाले आहे असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.
राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची भाजपला आवश्यकता नाही, त्याला आमचा विरोध आहे. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण त्यांना मत मिळत नाहीत. त्यांना बरोबर घेतल्यास भाजपला तोटा होईल. त्यांची भूमिका देशपातळीवर भाजपला सोयीची नाही. त्यामुळं त्यांना बरोबर घेण्याची गरज नाही. हिंदूंनी मंदिरात भोंगा लावण्याला विरोध नाही, पण जाणीवपूर्वक मशिदी पुढे भोंगे लावून तणाव निर्माण करू नये, मशिदीवरून भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला मात्र विरोध असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकार देशात हिंदुत्ववाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत या आरोपात तथ्य नाही. नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम, ख्रिश्चन समाजालाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा अजेंडा विकासाचा आहे. तीन तलाकचा कायदा रद्द केल्यानंतर मुस्लिम महिलांनी मोदी यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे ते फक्त हिंदू साठी काम करतात असं नसल्याचेही शेवटी बोलताना ते म्हणाले.
Tags: आरपीआयउपमहापौर पदकेंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्रीचंद्रकांता सोनकांबळेपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकरामदास आठवलेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)





















Join Our Whatsapp Group