पिंपरी (Pclive7.com):- स्मार्ट सिटी अशी ओळख असलेला प्रभाग क्र-२८ पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरात सध्या ‘पाणीबाणी’ सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. एक दिवसाआड तसेच अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा या भागात होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुतांश सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या प्रभागातील पाणी प्रश्न एक-दोन दिवसात न सोडवल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिला आहे.

शत्रुघ्न काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्र-२८ पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरात सद्यपरिस्थीत अनियमीत पाणी पुरवठ्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रभागात साधारण ७० ते ८० हजार नागरीवस्ती असुन यामध्ये साधारण १५० पेक्षा जास्त सोसायटी व उर्वरीत बैठी घरे आहेत. आज रोजी सदर सोसायट्यांना होणारा पाणीपुरवठा हा त्यांच्या गरजेपेक्षा ३० ते ४० टक्के इतका कमी आहे.
महापालिकेकडून सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तसेच अपु-या आणि कमी दाबाने मिळणारे पाणी दोन दिवस संपुर्ण सोसायटीला वापरण्यास पुरत नाही. याचा आयुक्त राजेश पाटील यांनी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. साधारण ५०० व त्यापेक्षा जास्त सदनिका असलेल्या सोसायट्यांना दररोज १० ते २० टँकर्स वर अवलंबुन रहावे लागते. दरमहा त्यांना लाखो रूपये फक्त या टँकर्स करीता खर्च करावा लागत आहे. याला कारणीभूत कोण? असा सवाल काटे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, माझ्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात परिसरात एकाही ठिकाणी टॅकर्स लागत नव्हता. वारंवार पाणीपुरवठा विभागाच्या संपर्कात राहुन सतत येथील पाणी प्रश्न मार्गी लावले होते. परंतु जेव्हा पासुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासनाचे नियंत्रण आले आहे तेव्हापासून या प्रभागात “पाणीबाणी” सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. कोणी कोणाला वाली उरलेला नाही असे कामकाज आज सुरू आहे. आज प्रत्येक नागरीक या “पाणीबाणी” विषयी मला जाब विचारीत आहेत. आज स्मार्ट सिटी म्हणुन आम्ही मिरवत आहोत पण सत्य परिस्थीती काही वेगळीच आहे. नागरीकांच्या मनात एक जनआक्रोश निर्माण झालेला आहे.
म्हणुनच या नागरीकांचा प्रतिनिधी म्हणुन मी विनंती करीत आहे की, येत्या एक-दोन दिवसात माझ्या प्रभागातील “पाणीबाणी” परिस्थिती सुधारली नाही तर मला लोकशाही पद्धतीने या विरोधात जनआंदोलन करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही असा इशारा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.





















Join Our Whatsapp Group