पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी पद्धतीने नियमित करण्यासाठी अर्ज करण्याकरिता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत नागरिकांना अर्ज करता येतील, अशी माहिती बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. दरम्यान, २० डिसेंबर २०२१ पासून चार महिन्यात नियमितीकरणासाठी केवळ ९५० अर्ज आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महापालिका हद्दीतील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ मध्ये सुधारणा करून अधिनियम १२ मार्च २०२१ ला आणि शुल्क निश्चितीचा आदेश १८ ऑक्टोबर २०२१ ला काढला आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहेत. महापालिकेने २० डिसेंबर २०१२ ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नागरिकांकडून अर्ज मागविले होते. या कालावधीत ५१० अर्ज आले आहेत. गुंठेवारीची योजना यशस्वीरित्या राबविण्याकरिता अर्ज स्वीकारण्यास ३० जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरच्या माध्यमातून केलेले अर्ज नागरी सुविधा केंद्रांत स्वीकारले जात आहेत. अर्जासोबत मालकी हक्कासाठी सातबारा उतारा व तत्सम कागदपत्रे, बांधकाम ३१ डिसेंबर २०२० पूर्वी बांधून पूर्ण झाल्याबाबत कर संकलन विभागाचा दाखला, मान्यता प्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी दाखला (दोन मजल्यापेक्षा जास्त मजल्यांची इमारत असल्यास), पाणीपुरवठा थकबाकी नसलेला दाखला, जलनिस्सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला, अर्जासोबत इमारतीचा प्लॅन, क्रॉस सेक्शन, इलेव्हेशन, साइट प्लॅन किंवा लोकेशन प्लॅन, खिडक्या व दरवाजे तक्ता व इतर माहिती नकाशात दर्शविणे आवश्यक आहे. इमारती पाहणीसह अर्जाची तांत्रिक छाननी नंतर नकाशे मंजूर झाल्यावर आवश्यक ते प्रिमीयम किंवा अधिमूल्य आणि इतर शुल्क भरल्यानंतर संबंधित नियमितीकरण दाखला व नकाशावर देण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group