नागरिकांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर केला प्रसिद्ध
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.१२) मंजुरी दिली. तसेच अंतिम आराखडाही जाहीर झाला. शहरातील आठ प्रभागाच्या प्रारुप रचनेमध्ये केवळ चार बदल केले आहेत. प्रभाग क्रमांक २ आणि १२, ३ आणि ५, ११ आणि ७, २६ आणि २७ मध्ये बदल केले आहेत. चऱ्होली, भोसरी, चिखली इंद्रायणीनगर, प्रेमलोक पार्क (चिंचवड) प्रभागात किरकोळ बदल केले आहेत.

प्रारूप रचनेच्या बदलानुसार काही भाग जोडून शेजारच्या प्रभागाला जोडला आहे. त्यामुळे काही प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झाला. इतर कोणत्याही प्रभागात बदल केलेला नाही. तब्बल ५ हजार ६८४ हरकती व सूचनांचा पाऊस पडल्यानंतरही मोजके प्रभाग बदल केले. या बदलांसह अंतिम आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. यामुळे इच्छुकांना कोणत्या परिसरात निवडणूक लढवायची आहे, हे स्पष्ट झाले.
महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारीला प्रसिद्ध केला होता. तीन सदस्यांचे ४५ व चार सदस्यांचा एक असे एकूण ४६ आहेत. एकूण १३९ नगरसेवकांची संख्या असेल. त्या आराखड्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या.
दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाला. राज्य सरकारने प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले. मात्र, याविरोधात १३ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेच्या अंतिम आराखडा निवडणूक आयोगाचे आयुक्त यु. पी. एस मदान यांच्यासमोर गुरुवारी सादर केला. त्यांनी गुरुवारी मंजुरी दिली.
आरक्षण सोडत
पिपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची तीन सदस्यीय पद्धतीची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी महापालिका निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली. महापालिका मुख्यालय क्षेत्रीय कार्यालयात अंतिम आराखडा प्रसिद्ध केला. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षण सोडत करण्यात येणार आहे.
सर्वात मोठा प्रभाग तळवडे-रुपीनगर
अनुसूचित जातीसाठी २२ तर अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव आहेत. ११४ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. महापालिकेच्या नगरसेवक संख्येत ११ ने वाढ झाली असून, १३९ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातीसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी १९ असेल. लोकसंख्येनुसार २२ प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीसाठी स्थानिक र स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सद्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्याच्यासाठी तीन प्रभाग आरक्षित असतील. अंतिम रचनेनुसार प्रभाग क्र. १ तळवडे, रुपीनगर याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्र. २ चिखली, मोरेवस्तीची आहे.

























Join Our Whatsapp Group