पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सुरू असलेल्या पावसामुळे पिंपळे सौदागर येथे एक मोठे झाड कारवर कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहाणी झाली नसून कारचे मात्र मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान थेरगाव मधील डांगेचौक परिसरातही रस्त्यावर एक झाड कोसळल्याची घटना आज घडली आहे.

प्रभाग २८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथील फाईव्ह गार्डन सोसायटीमध्ये पावसामुळे झाड पडल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जिवीतहाणी झाली नसून हे झाड सोसायटीतील सभासदाच्या चारचाकी गाडीवर कोसळल्याने गाडीचे मोठं नुकसान झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या उद्यान विभागाला संपर्क साधून झाड त्वरित हटविण्याच्या सूचना केल्या. यावेळी नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या टीमने घटनास्थळी जाऊन झाड हटविण्यासाठी मदत केली.

थेरगावमध्येही झाड कोसळल्याची घटना
तसेच थेरगाव येथील डांगे चौका जवळील भोईर एस्टेट या सोसायटीच्या मुख्य रस्त्यावरिल गुलमोहराचे झाड पावसामुळे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले. याघटनेत देखील सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. मात्र झाड रस्त्यात कोसळल्याने येथील सर्व सोसायटीचा रस्ता पूर्ण बंद झाला होता.

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधला. तसेच तातडीने हे झाड हटविण्याची सूचना केली. त्यानंतर महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने हे झाड बाजूला घेऊन नागरिकांसाठी त्वरित रस्ता मोकळा करून दिला.





















Join Our Whatsapp Group