आळंदी (Pclive7.com):- आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियांका अभिषेक उमरगेकर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. घरगुती कारणातून प्रियांकाने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आळंदी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. प्रियांका ही पिंपरी-चिंचवडमधील नगरसेविका कमल घोलप यांची कन्या आहे. प्रियांकाच्या आत्महत्येने उमरगेकर आणि घोलप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
९ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
प्रियांका घोलप आणि अभिषेक उमरगेकर यांचा ९ महिन्यापूर्वीच १६ नोव्हेंबर २०२१ रोजी विवाह झाला होता. काही महिन्यातच प्रियांकाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. प्रियंका आणि अभिषेक यांच्यात काल वाद झाला होता. मी आत्महत्या करते असं देखील प्रियांकाने धमकी दिली होती. त्यानंतर बेडरूमध्ये जाऊन ८ वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय. याबाबत अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.