लोणावळा (Pclive7.com):- लोणावळा शहरात मागील २४ तासात २३४ मिमी (९.२१ इंच) पावसाची नोंद झाली आहे. खरंतर काल दिवसभरात १७० मिमी पाऊस झाला होता. रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे लोणावळा धरणातील पाणी पातळी स्थिर असल्याने तुर्तास तरी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता नाही. मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास सतर्क रहावे लागेल असे टाटा कंपनीचे धरण प्रमुख बसवराज मुन्नोत यांनी सांगितले आहे.

टाटा धरणातून पश्चिम बाजुला डक्टलाईन द्वारे पाणी विसर्ग केला जात आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणात पाणी येण्याची आवक व बाहेर जाणारे पाणी यांच्यात तफावत निर्माण होऊन पाणी पातळी वाढत जाते. पाऊस थांबल्यास संकट टळू शकते. दरम्यान काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना अक्षरशः झोडपून काढले. वाहने चालविताना समोरचे निट दिसत नव्हते तर धबधबे प्रचंड क्षमतेने वाहत असल्याने त्याच्या जवळपास जाणे देखील मुश्कील झाले होते.
पावसासोबत वार्याचा वेग देखील प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या तुटल्याचे प्रकार घडले आहेत. लोणावळा शहरात आज सकाळपर्यंत १९६९ मिमी (७७.५२ इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजपर्यंत १३४८ मिमी (५३.०७ इंच) पाऊस झाला होता. जुलै महिन्यात दहा दिवस पडलेल्या पावसाने मागील वर्षीची सरासरी ओलांडत तब्बल ६२१ मिमी जादा पाऊस यंदा झाला आहे.





















Join Our Whatsapp Group