आळंदी (Pclive7.com):- श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या विश्वस्तांची माहे ऑगस्ट २०२२ ची मासिक सभा संस्थानच्या पुणे कार्यालयात आज संपन्न झाली. या सभेत सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
योगेश देसाई हे पुण्यातील प्रतिष्ठित व्यावसायिक असून देसाई बंधू आंबेवाले या पेढीचे मालक आहेत. त्यांनी यापूर्वी सन २०२१-२०२२ या वर्षीही प्रमुख विश्वस्तपदाची तसेच दोन वेळा श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्यात पालखी सोहळा प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळली आहे.
यावेळी विश्वस्त अभय टिळक, लक्ष्मीकांत देशमुख, अॅड.विकास ढगे पाटील आणि योगेश देसाई हे उपस्थित होते. याविषयी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.