पिंपरी (Pclive7.com):- भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून ‘हर घर तिरंगा’ चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांच्यावतीने प्रभाग क्र.१३ मधील निगडी, साईनाथनगर, यमुनानगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीसह पूर्ण परिसरातील नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप केले जाणार आहेत. त्यानुसार सचिन चिखले यांनी प्रभागात जनजागृती सुरु केली आहे.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहिम सुरू केली आहे.
याबाबत माहिती देताना सचिन चिखले म्हणाले की, या मोहिमेसाठी मनसे पूर्णपणे सज्ज आहे. राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान या अभियानात सर्वांनी सामील व्हावे. तसेच या अभियानाच्या अंतर्गत झोपडपट्टी, चाळी, वसाहती मध्यम वर्गीय सोसायटी, उंच इमारतींसह महापालिका, खासगी व सरकारी कार्यालये आदी ठिकाणी भारतीय तिरंगा डौलाने फडकविण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकांनी करावा. आणि स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव मोठ्या अभिमानाने, हर्ष अणि उल्हासाने सर्वांनी मिळून साजरा करावा असे आवाहन सचिन चिखले यांनी केले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या सोशल मिडीयावर, फेसबुक, ट्विटर, इस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, स्टेट्सला तिरंगा ठेवून देशाचा अभिमान वाढवावा. प्रभाग क्र.१३ मधील निगडी, साईनाथनगर, यमुनानगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीसह पूर्ण परिसरातील नागरिकांना त्यांच्या घरी, सोसायटीमध्ये तिरंगा फडकावायचा आहे त्यांनी मनसे कार्यालय, साईनाथनगर याठिकाणी संपर्क साधावा. तसेच तिरंगा ध्वज घ्यावा असे आवाहन मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले आहे.