आळंदी (Pclive7.com – प्रसाद बोराटे):- भारतीय संस्कृतीत अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. त्यामागचा उद्देश एकच की सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपावी आणि याच उद्देशाने नवरात्रीचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत २९ सप्टेंबर गुरूवार रोजी भोंडल्याचे, रासदांडियाचे आयोजन करण्यात आले होते.
नवरात्र, दांडिया व भोंडल्याचे महत्त्व उपशिक्षिका शेळके वैशाली यांनी सांगितले व पारंपारिक गीताचे गायन केले. सर्व महिला शिक्षिकांनी ऐरावत पुजन करून ऐलमा पैलमा या पारंपारिक गाण्याने भोंडल्याची सुरुवात करून भोंडल्याची इतर पारंपारिक गाणी मुलांसह गाण्यात आली. गाण्यानंतर सर्व मुलींनी, मुलांनी गाण्याच्या तालावर दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने पौष्टिक खिरापत देण्यात आली.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशाला तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर काॅलेज ही उपक्रमशील शाळा आहे. प्रशालेत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक, मानसिक, कलात्मक, सामाजिक व भावनिक विकास होण्याकडे प्रशालेचा कल असतो. त्यादृष्टीने प्रशाला दरवर्षी वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबवत असते.
या कार्यक्रमास श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सुर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, किसन राठोड, क्रीडा प्रमुख श्रीरंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन राहुल चव्हाण यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रदिप काळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वर्षा काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कांबळे निशा, भालेराव प्रतिभा तसेच बालक मंदिरातील सर्व शिक्षिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.