पिंपरी :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत आज पिंपरी चिंचवड शहराचा दौरा करणार आहेत. यावेळी शहरातील तिन्हीही विधानसभा व लोकसभेचा आढावा घेतल्यानंतर शिवसेना शहराध्यक्ष पदाबाबत कोणाची वर्णी लावायची, यावर शिक्कामोर्तंब होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चिंचवडमधील एका खासगी हॉटेलमध्ये शिवसेना पक्षाचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघाचा आढावा घेवून निवडणुकीतील संभाव्य उमेदवाराची चाचपणी केली जाणार आहे. त्यानुसार सकाळी ११ ते १२ पिंपरी विधानसभा, १२ ते १ भोसरी विधानसभा आणि १ ते २ चिंचवड विधानसभा मतदार संघाचा मेळावा घेण्यात येणार आहे.
मेळाव्यात विधानसभा निहाय शाखा प्रमुखांच्या निवडणुका व संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा रंगणार आहेत, त्या-त्या मतदार संघातील शिवसैनिकांची मते विश्वासात घेतली जाणार आहेत. तसेच शिवसेना शहरप्रमुख पदाबाबत लोकप्रतिनिधींचे म्हणणे ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर त्या पदाबाबत शिवसैनिकांना विचारणा केली जाणार आहे. त्यामुळे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसैनिकांचा शहर प्रमुख पदाबाबत अहवाल ‘मातोश्री’वर गेल्यानंतर निवडीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.